मुंबईच्या स्वच्छतेचा 'खरा हिरो स्वच्छता कर्मचारी' : एकनाथ शिंदे

Santosh Gaikwad December 09, 2023 06:02 PM


मुंबई  :-  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी,मुंबई च्या स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी सुरु असलेली स्वच्छ्तेची चळवळ ही महापालिका कर्मचारी,  अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक आहे. मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याची  कौतुकाची थाप सफाई कर्मचा-यांना देत  त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 


  प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. दि.3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री   शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 


 जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमित साटम, माजी मंत्री दिपक सावंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते. 


   यावेळी बोलताना मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले, स्वच्छ्ता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सयंत्रे व वाहने वापरण्यात येत असल्यामुळे  परिसर कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे. लोकांनाही यामुळे परिसर स्वच्छ राखण्याची सवय अंगवळणी पडते. स्वच्छता अभियान ही आता एक लोकसहभाग लाभलेली लोकप्रिय चळवळ झाली आहे. लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग या अभियानात आहे, ही बाब देखील नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे. धारावी सारख्या  झोपडपट्टीतील भागातही ही स्वच्छतेची कामे प्रभावीपणे होत आहेत. यामध्ये रस्ते,नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे.बांधकाम क्षेत्रातील राडारोडा याचीही सफाई करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.


इस्कॉन मंदिरात मुख्यमंत्र्यांचा भाविकांशी संवाद


  इस्कॉन मंदीर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री यांची ग्रंथतुला करुन सत्कार करण्यात आला. 


  मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले महाराष्ट्रात इस्कॉनचे 39 तर मुंबईमध्ये जवळपास चार सेंटर असून 897 मंदिराचे व्यवस्थापन तसेच सामाजिक उपक्रम इस्कॉनद्वारे राबवले जातात. शाळा व रुग्णालयांमध्ये गरजू विद्यार्थी व रुग्णांना मदत करण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी विविध उपाय योजना,  समाजातील सर्व घटकांना सामाजिक सेवेची  प्रेरणादायी ऊर्जा देण्याचे काम इस्कॉन करीत आहे. मुंबई महापालिकेच्या 160 शाळांमध्ये 27 हजार  विद्यार्थ्यांना तसेच नवी मुंबई महापालिकेच्या 23 हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याचं कामही केले जाते असेही मुख्यमंत्री म्हणाले.