मराठा आरक्षण सरकारमध्ये दोन गट : छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, शिंदे गटाचे आमदार आक्रमक !

Santosh Gaikwad January 31, 2024 04:33 PM


मराठा आरक्षणावरून राज्य सरकारमध्ये दोन गट 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणाला विरोध केला आहे. त्यामुळे राज्य सरकारमधील  घटक पक्षांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले असून त्यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हाकालपट्टी करा अशी मागणी केली आहे.  

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील सभेत मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबध्द असल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांच्या हाती अध्यादेश दिला. मात्र या अध्यादेशाला मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही अशी भूमिका घेत ओबीस नेत्यांची बैठक घेत अध्यादेशाला कोर्टात आव्हान देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून सरकारमधील देान गट समोर आले आहेत. त्यानंतर शिंदे गटातील दोन आमदारांनी भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. 


काय म्हणाले संजय गायकवाड 


शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत. छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत. हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते, अशावेळी भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात , असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित करत टीका केली आहे.


संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया ..

 संजय गायकवाड यांचं वक्तव्य वैयक्तिक असलं तरी, काही लोकांना राजकारण करायचं असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे. सरकारमधील मंत्र्यांना सरकार चुकलंय हे सांगायचं असेल तर मंत्रिमंडळ बैठकीत बोलले पाहिजे. बाहेर येऊन बोलायचे असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडले पाहिजे. आता काही लोक आमचे सरकार आल्यास आम्ही असं केलं असतं तसं केलं असतं म्हणतात. मग पूर्वी तुमचं सरकार होतं ना तेव्हा का नाही केलं? राजकारण करताना कोणत्याही समाजाला वेठीस धरू नका”, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी सुनावलं.

------