कोविडमुळे मृत ३८ सरपंचांचे कुटुंबीय अद्यापही मदतीविना

Santosh Gaikwad March 17, 2023 12:00 AM

मुंबई :   कोरोनाशी लढा देताना ग्रामीण भागातील जनतेला आधार देत असताना राज्यभरात ३८ सरपंचांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना अजूनही निधी देण्यात आलेला नाही. कोरोनाचा प्रभाव कमी होऊन दोन वर्षे झाली. आता तर सर्व व्यवहार सुरळीत आहेत. मात्र कोरोनाशी लढा देताना प्राण गमावलेल्या सरपंचांना त्वरित निधी देण्यात यावा, अशी मागणी भाजपचे श्रीकांत भारतीय यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. ग्राविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही  प्रकरणे तपासून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

माहे २०१९ मध्ये सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात येईल, अशी घोषणा  शिर्डी येथे एका कार्यक्रमात करण्यात आली होती. मात्र तशी भरीव वाढ झालेली नाही. तसेच  मानधनाची किचकट प्रक्रिया मोडीत काढून गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सरपंच, उपसरपंच यांना मानधनाचे वाटप करण्यात यावे, तसेच जनतेच्या कामासाठी मुंबईत येणाऱ्या संरपंचांच्या निवासाची व्यवस्था म्हणून नवी मुंबईत सरपंच भवन उभारण्यात यावे आणि शासकीय कार्यालयात प्रवेश  मिळावा म्हणून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे या मागणीबरोबच कोविडमुळे मृत्यू झालेल्या सरपंचांच्या कुटुंबियांना आर्थिक साह्य करण्याची मागणी श्रीकांत भारतीय यांनी केली.   

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी उत्तर देताना सांगितले की, सरपंचांच्या निवासाची सोय म्हणून नवी मुंबईत सरपंचभवन  उभारण्यास सरकार बांधील असून, लवकरात लवकर त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. सरपंचांचे मानधन २०१४ पासून सुरू करण्यात आले असून, आता  त्यात वाढ करत ते ५००० (पाच हजार) रुपये असल्याचे महाजन यांनी निदर्शनास आणले. कोरोना काळात कर्तव्य बजावताना सरपंचांचे मृत्यू झाल्याचे निष्पन्न् झाल्यास त्यांबाबत विचार करण्यात येईल, असेही महाजन यांनी सांगितले.