मोदीं शहांसाठी आचारसंहितेत बदल केला का ? : उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला खोचक सवाल !

Santosh Gaikwad November 16, 2023 06:34 PM


मुंबई : मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला मतदान केलं तर रामलल्लाच्या दर्शनासाठी मोफत अध्योध्यावारी घडवेन, या वक्तव्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. आज (गुरूवारी) पत्रकार परिषद घेत ठाकरे यांनी अमित शहांवर निशाणा साधला. निवडणुकांमध्ये आचारसंहिता असते याची आठवण करून देत,  मोदी शहांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियम बदलले आहेत का ? असा खेाचक सवालही उपस्थित केला. निवडणूक आयोगाने आचार संहितेमध्ये बदल केले असतील तर ते सगळ्यांना समान असायला हवा असंही ठाकरे म्हणाले.   

 

 

 उद्धव ठाकरे म्हणाले,   "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७ साली विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत  हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवली, त्यावेळी आमचे पाच ते सहा आमदार निवडणूक आयोगाने बाद ठरवले होते.  हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना निवडणुकीला उभे राहण्यास निवडणूक आयोगाने बंदी केली होती. तसेच, बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकारही काढून घेण्यात आला होता. मात्र, आता ५ राज्यांतील विधानसभांच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सरळसरळ धर्माच्या आधावर मते मागत आहेत. तरीही त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही.  


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंगबली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ असं जाहीर केलं आहे. अमित शाहांनी फक्त मध्य प्रदेशपुरती ही घोषणा करू नये. देशातील कानाकोपऱ्यात रामभक्त आहेत. त्या भक्तांना सोयीनुसार मोफत अयोध्यावारी  भाजपने घडवावी.   केवळ भाजप सत्तेत आहेत म्हणून त्यांन " फ्री हिट " द्यायची आणि आम्ही केाही केलं की आमची " हिट विकेट " काढायची अशा शब्दात ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून सुनावले आहे. 

 

सगळयाचा हिशोब करणार ..

 

मालेगावात अद्वय हिरे यांना अटक झाली असली तरी पक्ष त्यांच्या पाठीशी आहे असं उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. हिरेंवर कारवाई केली जाते पण आम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावर कारवाई केली जात नाही कि चौकशीही होत नाही या सगळयांचा हिशोब आम्ही सरकार आल्यावर करणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.