रिपब्लिकन पक्षाचे राज्यव्यापी महाअधिवेशन २८ मे रोजी शिर्डीत : मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती !

Santosh Gaikwad May 19, 2023 03:37 PM


मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य महाअधिवेशन येत्या दि. २८ मे रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. या महाअधिवेशनात  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्थानिक जिल्हयातील अनेक मान्यवर नेते लोकप्रतिनिधी  उपस्थित राहणार आहेत. 


 रिपब्लिकन पक्षाच्या या राज्यव्यापी महाअधिवेशनात महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भ, पुर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई, ठाणे प्रदेश या भागातुन हजारोंच्या संख्येने रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या महामेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली यावेळी महाराष्ट्र सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे  उपस्थित होते.  


 रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे महाअधिवेशन दि.  २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता शिर्डी येथील कांदा मार्केट समोरील मैदान ; शिर्डी राहता रोड, शिर्डी, जि. अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दलित, आदिवासी , झोपडपट्टीवासी, मराठा , शेतकरी, कामगार आदी सर्व वर्गांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांचे ठराव मंजुर करण्यात येणार आहेत.