रत्नागिरीत शेतक-यांची फसवणूक करून जमिनी बळकावल्या : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची चौकशीची मागणी

Santosh Gaikwad March 23, 2023 12:00 AM


मुंबई : रत्नागिरीतील निगुडवाडी व कुंडी या गावातील हजारो एकर जमिनी बेकायदेशीपणे शेतक-यांची फसवणूक करून बळकावण्यात आल्या आहेत.  तसेच मयत भारतीय सैनिक भिका कुशा जाधव यांना शासनाने दिलेली सुमारे ७६ एकर वतन जमीन हडप करण्यात आली आहे. वनजमिनी खरेदी करण्यात आली असून तुकडाबंदी आणि तुकडेजोड कायद्याचा भंग करण्यात आला आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत केली. 

खासदार विनायक राऊत यांनी माहिती देताना सांगितले की, आर. आर. डब्ल्यू. टी. एल. या कंपनीला राजनांदगांव ते वरोरा ७६५ केवीडी / सी ट्रान्समिशन लाईन टाकणे या प्रकल्पासाठी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया येथील क्षेत्र २८४.२७ हेक्टर वनक्षेत्र   क्षेत्र वनखात्याकडे वर्ग करण्याच्या बदल्यात मौजे निगुडवाडी व कुंडी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी या गांवामधील सुमारे १२३.४६ हेक्टर जमीन सन २०१५ ते २०१८ या दरम्यान बेकायदेशीररित्या शेतकऱ्यांची फसवणूक करुन बळकवण्यात आल्या आहेत. कुचांबे ते ओझरे, संगमेश्वर तालुक्यातील सुमारे ५० कि.मी.मधील सुमारे ५००० एकर जागा बेकायदेशीरपणे खरेदी करण्यात आली आहे आणि अशा प्रकारचे व्यवहार अद्याप चालू आहेत. सामाईक मालकीच्या जमिनी खरेदी करताना सहहिस्सेदारांचे संमतीपत्र न घेता काही हिस्सेदारांनी फक्त प्रतिज्ञापत्र करुन खरेदीपत्र केले आहे. मयत व्यक्तींचे वारस तपास न करता मयत व्यक्तीच्या एखाद्या वारसाने प्रतिज्ञापत्र करून खरेदीपत्र केले आहे. तसेच काही व्यवहार डमी व्यक्ती उभ्या करून व बोगस मुखत्यार करुन खरेदीपत्र केले आहेत. कंपनीने खरेदी केलेल्या जमिनीची मोजणी करुनच व जमिनीला सीमांकन करुन वनविभागाच्या ताब्यात देणेची अट विभागीय वन अधिकारी यांनी घेतली होती. परंतु जमिनी मोजणी न करता वनविभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.  या काही व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांना मोबदला न देता त्यांच्या जमिनीची विक्री झाली आहे व वनविभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला न देता व फसवणूक करून जमिनी हडप करण्यात आल्या आहेत. सदर व्यवहारामध्ये अभिलेख नोंदी मंजूर करताना शासनाच्या विहित अवधीचे पालन न करता नोंदी मंजूर करण्यात आल्या आहेत असे राऊत यांनी सांगितले.

नजमिनी खरेदीचे व्यवहार स्थगित करून चौकशी करावी 

देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये छत्तीसगढ़, ओडिसा या ठिकाणच्या कोळसा खाणींना वनजमिनी देण्यात आलेल्या असून त्याबदल्यात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मौजे कुचांबे ते मौजे ओझरे येथील जमिनी बेकायदेशीररित्या खरेदी करुन कंपनीच्या नावे वर्ग करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर त्या वनखात्याला सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत. सदर खरेदी व्यवहार करताना तुकडेबंदी व तुकडेजोड कायद्याचा भंग करण्यात आलेला आहे व भूमीअभिलेख कडून मोजणी व नकाशे (सीमांकन) तयार करुनच सदर जमीन वनविभागाकडे वर्ग करण्याच्या अटीवर विभागीय वनअधिकारी यांनी परवानगी दिली होती. परंतु या अटीची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. तसेच मोजणी न झाल्यामुळे सामाईक जमिनीपैकी कोणती जमीन वनविभागाकडे आहे व कोणती जमीन शेतकऱ्यांकडे आहे हे समजणे कठीण आहे. तरी दि. १८.१.२०१८ ची अतिरिक्त जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी दिलेल्या परवानगी मधील अटींची पूर्तता न झाल्यामुळे सदरचे व्यवहार हे रद्द करण्यात यावेत. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत देण्यात याव्यात व या जमिनीच्या बदल्यात वनविभागाने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमधील सदर कंपनीला देण्यात आलेली जमिनी परत घ्यावी आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सदर खरेदी व्यवहार त्वरित स्थगित करावेत अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
------