मराठा आरक्षणाचा लढा तीव्र : जरांगे पाटील उपोषणावर ठाम

Santosh Gaikwad October 29, 2023 06:34 PM


मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आक्रमक झाला आहे तर आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलले आहेत. रविवारी उपोषणाचा पाचवा दिवस आहे. सरकारला चर्चेसाठी दारं खुली केली आहेत. दोन दिवस मी बोलू शकतो, त्यामुळे दोन दिवसात काय बोलायचे ते बोला माझे ह्दय बंद पडले तर सरकारचे ह्दय बंद पडलेच म्हणून समजा असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. 


आज उपोषणादरम्यान पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी उपोषणापासून मागे न हटण्याचा निर्णय जाहीर केला. एकतर मराठ्यांना आरक्षण द्या किंवा मराठ्यांशी सामना करा, असं म्हणत मनोज जरांगे यांनी आपल्याला शांततेत आंदोलन करायचं असल्याचं म्हटलं. सकाळी आणि आता दुपारी वैद्यकीय तपासणी साठी जरांगे यांनी नकार दिला आहे. डॉक्टरांचे पथक तसेच परत गेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही काळापासून आंदोलन सुरु आहे. मात्र, अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे, तर काहीजण टोकाचे पाऊल उचलताना पाहायला मिळत आहे.


राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आक्रमक झाला असून राजकीय नेत्यांना ठाणे जिल्हयात काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार घडत आहे. शेकापने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी येथील मतदार संघात थेट बॅनर लावले आहेत मराठा समाजाचा अंत पाहू नका असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. शेकापचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी हा बॅनर लावला आहे. त्यामुळे या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  


*समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय ? : उध्दव ठाकरे*


शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली आहे. ठाकरे म्हणाले, त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे. व ते त्यांना मिळायला हवे. ओबीसी, आदिवासी  सह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे.

 जरांगेपाटील उपोषण करीत आहेत पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे..पण त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही असे ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 


*जरांगेंनी मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवावा; देवेंद्र फडणवीस*

 

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहीजे. डॉक्टरांची टीम तेथे हजर आहे. शेवटी जीव हा अत्यंत महत्वाचा आहे. जरांगेंच्या सोबतच्या लोकांनी देखील त्यांची काळजी घ्यावी. स्वत: मुख्यमंत्री या विषयात लक्ष घालून आहेत. जे योग्य निर्णय आहेत ते झाले पाहीजे असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  


*राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट*


‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावं या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, ‘राज्य सरकारने मनोज जरांगे यांना जे आश्वासन दिले होते, ते एक महिन्याच्या कालावधीसाठी होते, आता जरांगे हे पुन्हा उपोषणावर बसले आहेत. लोक ही त्यांना उपोषण करून पाठिंबा देत आहे. राज्यपालांनी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला तातडीने संपर्क साधला पाहिजे. मराठा आंदोलनाकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं असल्याचं सांगितलं.