निवडणुकीत एका-एका मताचे महत्व ओळखून सतर्कतेने काम करा - नाना पटोले

Santosh Gaikwad November 27, 2023 10:13 PM


मुंबई  : लोकसभा निवडणुकीला अवघा दोन-तीन महिन्यांचा कालावधीच राहिलेला आहे, त्यामुळे अधिक जोमाने काम करावे लागणार आहे. मतदारयाद्या अद्ययावत करा, जनसंपर्क वाढवा तसेच बुथ स्तरापर्यंत संघटनेतील सर्व नियुक्त्या तातडीने पूर्ण केरणे गरजेचे आहे. निवडणुकीत एका-एका मताचे महत्व असते, एक, दोन सहा, दहा मतांनी उमेदवाराचा पराभव झालेला आहे त्यामुळे प्रत्येक मताचे महत्व ओळखून काम करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.


काँग्रेस मुख्यालय, टिळक भवन येथे नेतृत्व विकास अभियानाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या कार्यशाळेत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बांधणी महत्वाची आहे. पक्ष संघटनेतील सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत का नाही? यासंदर्भात मागील महिन्यात राज्यातील सर्व विभागांमध्ये जाऊन आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे १ लाख ८ हजार बुथ आहेत, हे सर्व बुथ सक्रीय असले पाहिजेत. एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभाग, युवक काँग्रेस, महिला आघाडी, एनएसयुआय, युवक काँग्रेस या घटकांनी झोकून देऊन काम केले पाहिजे.  नेतृत्व विकास अभियानातूनच नवीन नेतृत्वाला वाव मिळणार असून ही चांगली संधी आहे, जो काम करेल त्याचे राजकीय भविष्य उज्ज्वल ठरेल. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात हे देशातील सर्वाधिक लोकसभा सदस्य असणारे राज्य असल्याने राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून देण्याचा संकल्प आहे, त्यासाठी जोमाने काम करा. काँग्रेसची सत्ता यावी ही जनतेची इच्छा आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून लोकांपर्यंत पोहचले पाहिजे.