होळी, धूलिवंदनासाठी बाजारपेठा सजल्या

Santosh Gaikwad March 21, 2024 07:08 PM



मुंबई : दोन दिवसांवर होळी सण येऊन ठेपला असून मुंबई ठाणे परिसरातील बाजारामध्ये विविध प्रकारच्या रंगांनी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे; तर खरेदीसाठी नागरिकांमध्येदेखील उत्‍साह दिसून येत आहे. यंदा काही वस्‍तूंचे भाव वधारले असले तरी मोठ्या प्रमाणावर होळीच्‍या साहित्‍याची खरेदी केली जात आहे.

कोकणासह राज्यासह  होळी सण मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. मुंबई ठाणे रायगड पालघर परिसरातील कोकणवासिय हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. त्‍यानुसार शहरातील बाजारपेठांमध्ये अनेक ठिकाणी विविध रंग व पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. पिचकाऱ्यांमध्ये यंदाही टॅंक, पंप, कार्टून, प्रोजन, डोरेमोन, मिकी माऊस, स्पायडर मॅन आदी विक्रीस उपलब्ध आहेत. बच्चेकंपनीकडून शक्‍यतो कार्टून पिचकारी विकत घेण्याचा कल दिसून येत आहे; तर यंदा नैसर्गिक रंग विकत घेतले जात आहेत. त्‍यांची मागणी वाढल्‍यामुळे दरातदेखील वाढ झाली आहे. तसेच विविध प्रकारचे कलर केलेले टी-शर्टही विक्रीसाठी आले आहेत. होळीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बाजारपेठेत उत्साह आहे.