काँग्रेस सरकारच्या मोफत बससेवेचा लाभ घेत हुबळीतील तरुणी पळाली प्रियकरासोबत

Santosh Sakpal June 15, 2023 05:55 PM

तरुणीचं प्रेमप्रकरण कळल्यापासून तिच्या आई वडिलांनी तिच्याकडील मोबाईल आणि पैसे काढून घेतले होते.

हुबळी : सरकारने लागू केलेल्या जनकल्याणकारी योजनांचा लोक कधी कधी असा फायदा उठवतात की त्याचा आपण कधी विचारही करू शकत नाही. दक्षिण कन्नड भागातूनही अशीच एक बातमी समोर आली आहे. कर्नाटकात महिलांसाठी मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसने या योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या योजनेचा फायदा घेत एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पलायन केलं आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित तरुणी विवाहित असून तिला ११ महिन्यांचं बाळ आहे.

कर्नाटकातील हुबळी येथे राहणारी तरुणी पुत्तूर येथे मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या प्रेमात पडली होती. या प्रेमप्रकरणाविषयी संबंधित तरुणीच्या घरी कळल्यावर तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत लावून दिलं. लग्नानंतर तरुणी गरोदर राहिल्याने बाळंतपणासाठी ती माहेर आली. लग्नानंतरही ती आपल्या प्रियकराच्या संपर्कात होती. माहेरी आल्यानंतर तरुणीच्या प्रियकराने तिला त्याच्याकडे बोलावलं होतं. परंतु, पुत्तूर येथे जाण्याकरता तिच्याकडे पैसे नव्हते. तरुणीचं प्रेमप्रकरण कळल्यापासून तिच्या आई वडिलांनी तिच्याकडील मोबाईल आणि पैसे काढून घेतले होते.

दरम्यान, कर्नाटकात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. या सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार राज्यात महिलांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे या मोफत बस सेवेचा लाभ उठवत १३ जून रोजी तिने सरकारी बसमधून प्रवास करून ती प्रियकारकडे गेली. तरुणी घरातून गायब झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी थेट पुत्तूर गाठलं. कारण त्यांना माहित होतं की ती तिथेच जाणार. तिथे गेल्यावर समजलं की तिचा प्रियकरसुद्धा कदंबडी गावातून पसार झाला आहे. याप्रकरणी पुत्तूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, पळून गेलेली तरुणी आणि तिचा प्रियकर सिद्दकत्ते गावात आहेत.