अधिवेशनात पडसाद, संभाजी भिडेंना अटक करा : काँग्रेसची मागणी

Santosh Gaikwad July 28, 2023 05:07 PM


मुंबई :  संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. महात्मा गांधी यांचे खरे वडील मुस्लिम जमीनदार होते. मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते, असे तारे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी तोडले आहेत. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे संतप्त पडसाद उमटले. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्याकडे सभागृहाचं लक्ष वेधीत.  संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडेंचा बंदोबस्त करून आजच सभागृहात निवेदन करण्याची मागणी  केली. 


अमरावतीत संभाजी भिडे नावाच्या एका गृहस्थाने राष्ट्रपित्याबद्दल अत्यंत निंदापूर्वक, नालस्तीपूर्वक विधान केलं आहे. आपण त्याची माहिती घेतली असेल. अशा प्रकारची समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला आयपीसी 153 किंवा जो काही कलम असेल त्यानुसार ताबडतोब अटक केली पाहिजे. समाजात दंगेधोपे आणि तणाव निर्माण करण्याचा या व्यक्तिचा जाणूनबुजून प्रयत्न असतो. हा पहिल्यांदाच केला नाही. यापूर्वीही त्यांनी असा प्रयत्न केला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही. 


थोरात म्हणाले, पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, असे आमचे स्पष्ट मत आहे. महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते. असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. थोरात यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले, एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडे सारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल.


 मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून बाळासाहेब थोरात भडकले


विधिमंडळाचे कामकाज हे सर्वोच्च आहे, या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले जातात, त्यामुळे निदान प्रश्नोत्तराच्या तासाला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. हा संकेत आता पाळला जात नाही, अध्यक्षांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सक्त शब्दात टाकीत दिली पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली.

आज दिवसाचे विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, हे सर्वोच्च सभागृह आहे. महाराष्ट्राचे प्रश्न इथे मांडले जातात, ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या माध्यमातून शासन आणि यंत्रणा गतिमान होते. या अगोदर कायम प्रश्नोत्तराच्या तासाला बाकीची कामे बाजूला ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री जातीने हजर राहायचे. आता जर मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला सभागृहात येणार नसतील तर मग आमदार त्यांची काम घेऊन त्यांच्या दालनात जातात आणि सभागृहात त्यामुळे उपस्थिती कमी होते. ज्या सदस्यांना प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आहे त्यांचे प्रश्न सुटत नाही. 

लक्षवेधी दरम्यानही बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून प्रश्न उपस्थित केला, ज्या त्या खात्याचे मंत्री जर उपस्थित नसतील तर मग लक्षवेधीला अर्थ काय उरतो. मंत्री जर असे सांगत असतील की सकाळी सहा वाजता मला उठावे लागते, तर सकाळी उठण्यात की उशिरापर्यंत काम करण्यास वावगे काय? आपण मंत्री झालो आहोत, त्यामुळे या गोष्टी कराव्यात लागतात. मंत्रीपदाच्या मोठेपणात या सर्व गोष्टी दडलेल्या आहेत. त्यामुळे कामकाज मंत्री महोदयांनी गांभीर्याने घेतले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि सदस्यांचे समाधान केले पाहिजे.