बुलढाणा बस अपघात : टायर फाटला, बसने पेट घेतला, २५ प्रवासी होरपळले...

Santosh Gaikwad July 01, 2023 10:33 AM


बुलढाणा :  समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने बस अनियंत्रित होऊन डिव्हायरला धडकली आणि अचानक डिझेलच्या टाकीने पेट घेतल्याने या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर ८ प्रवाशी जखमी झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.


असा झाला अपघात ...

विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने निघाली. १ जुलैच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास बस बुलढाणा येथील सिंदखेडराजा परिसरात आली. बसचा वेग जास्त असल्याने समोरील टायर फुटले. त्यामुळे बस थेट दुभाजकाला धडकली. बसची डिझेलची टाकी फुटल्याने क्षणार्धात बसने पेट घेतला. बस दरवाजाच्या दिशेने उलटल्याने बसमधून प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या. मात्र, गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या अपघातात चालकासह ८ जणांचे प्राण वाचले. या भयानक घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अपघात होण्यापूर्वी काही तास आधी विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. यानंतर पुढे बुलडाण्याजवळ बसला अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये बसचा कोळसा झाल्याचं भीषण दृश्य फोटोंमधून पाहता येऊ शकतं.


गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. दररोज किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहे. परिवहन विभागाकडून अपघात रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हणाले.


पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्ग बस अपघात प्रकरणी शोक व्यक्त केला. "बुलडाणा येथे झालेल्या भीषण बस अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रचंड दुःख झालं आहे. या अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींचे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी आहे असे पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारमार्फत मृतांच्या नातेवाईंकांना दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा मोदींकडून करण्यात आली आहे.