अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी !

Santosh Gaikwad March 30, 2024 09:29 PM



मुंबई, दि. ३० : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४  करिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून याअंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देणार असल्याचे माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम् यांनी येथे दिली.

 मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत  एस. चोक्कलिंगम् बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, सह मुख्य निवडणूक अधिकारी  मनोहर पारकर, अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

            यावेळी  चोक्कलिंगम् यांनी सांगितले की, राज्यातील एकुण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे १,१६,५१८ अंध मतदार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने ४० % दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व ८५ वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छूक मतदारांना १२  डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार राज्यभरातून दि. २८ मार्च पर्यंत ८५ वयावरील जेष्ठ नागरिक यामध्ये १७ हजार ८५० मतदारांचे तसेच ४० % दिव्यांगत्व असलेले  ५ हजार ४५३ दिव्यांग मतदारांचे १२ डी चे अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा यामधील ५३ मतदारांचे २८ मार्च पर्यंत १२ डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत.

            भारत निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांसाठी या निवडणूकीत  190 अंतिम मुक्त चिन्हे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत तसेच भारत निवडणूक आयोगाने राज्यामध्ये सहा राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि चार राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्ष यांना मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्ये विविध राजकीय पक्षांच्या २४१  एवढ्या प्रमुख प्रचारकांना परवानगी देण्यात आली आहे.

 १ हजार ६५६ भरारी पथक 

 राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पुर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियत्रण समिती व अपिलिय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीकडे पूर्व प्रमाणिकरणासाठी  (PRE CERTIFICATION) साठी  दोन राजकीय पक्षांचे दोन अर्ज प्राप्त झाले असून  कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती चोक्कलिंगम् यांनी यावेळी दिली. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्यभरातील ४८ लोकसभा मतदार संघामध्ये अवैध रोख रक्कम, दारु, ड्रग्ज इ. जप्त करण्यासाठी  १ हजार ६५६ Flying Squad Team (FST) व  २०९६  Static Surveillance Team (SST) स्थापन करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्र

महाराष्ट्र राज्यासाठी विशेष निरिक्षक (Special General Observer)म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी  धर्मेंद्र एस गंगवार व विशेष पोलिस निरिक्षक (Special Police Observer) म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी एन. के. मिश्रा यांची नियुक्ती केली आहे.  राज्यामध्ये या निवडणूकीसाठी ९८ हजार ११४  इतक्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

२७ हजार ७४५ शस्त्रास्त्रे जमा 

कायदा व सुव्यवस्था यंत्रणेमार्फत दि.  २८ मार्च पर्यंत २७,७४५ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत तसेच  १९० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परवाना नसलेली ५५७  शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत २७,६८५ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.