बारसू संघर्ष : शरद पवारानी दिला सरकारला हा सल्ला ...

Santosh Gaikwad April 26, 2023 03:15 PM


मुंबई :  बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर यामुळे  राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असतानाच आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.बारसूत सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आंदोलक आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी यांची बैठक बोलावण्याची सूचना उद्योगमंत्री सामंत यांना केल्याचे पवार यांनी सांगितले

बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. ठाकरे गटानेही स्थानिकांच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं असून सरकराच्या अडचणीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणावर मार्ग निघावा म्हणून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी या प्रश्नी सरकारने स्थानिकांचे प्रश्न समजून घ्यावेत. त्यावर तोडगा काढावा. चर्चेतून तोडगा निघाला नाही तर या चर्चेत जे मुद्दे आले त्यावरून आपण काही पर्याय काढू, असा सल्ला शरद पवार यांनी सामंत यांना दिला आहे.

राज्याच्या दृष्टीने एखादा महत्त्वाचा प्रकल्प तुम्ही करत असाल तर स्थानिकांना तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे. स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध असेल तर तो का आहे, याचा विचार करून त्यावर तोडगा काढला पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या आंदोलक आणि राज्य शासनाच्या बैठकीत काय निष्कर्ष निघतो, हे आम्ही पाहू. मात्र या बैठकीनंतरही प्रश्न कायम राहिल्यास सर्वपक्षीय लोक चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, असंही शरद पवार म्हणाले. सामंत यांनी हा सल्ला मान्य केल्याचं पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

असा वेडेपणा करू नका...


राज्यात अजित पवार यांच्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. त्यांची भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली पोस्टर्सही लावली जात आहेत. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, असा वेडेपणा करू नका असं अनेकदा सांगितलं आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात लवकरच राजकीय भूकंप होईल असे विधान अनेकदा केले. याबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री बदलाबाबत मला माहिती नाही. संजय राऊत हे पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांना जास्त माहिती असेल.
**