स्व बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला होणार विलंब !

Santosh Gaikwad January 06, 2024 09:26 AM



मुंबई : राज्य सरकारतर्फे दादर येथील शिवतीर्थाजवळील महापौर बंगल्यात साकारण्यात येत असलेल्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया नव्या ठेकेदाराकडून करण्याची मागणी ट्रस्टने केली आहे. मात्र, नगरविकास विभागाने त्यावर अद्याप निर्णय न घेतल्याने स्मारकाच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. 


दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास ९१ टक्के पूर्ण झाले आहे. मार्च २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होणे, अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार, प्रशासकीय ब्लॉक आणि इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकाम, माजी महापौरांच्या बंगल्यातील सांस्कृतिक वारशाचे जतन तसेच आजूबाजूच्या परिसराचे लँडस्केपिंग आणि सुशोभीकरण यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ठाकरे यांची कारकिर्द दृक-श्राव्य द्वारे मांडली जाणार आहे.

२०२३ च्या पहिल्या सहामहीत दुसऱ्या टप्प्यातील काम एमएमआरडीएकडे सोपविण्यात आले आहे. एमएमआरडीएने स्मारकाशी संबंधित डिजिटल कामाकरिता निविदा मागवल्या. तसेच हैदराबादमधील एका ठेकेदाराची नियुक्ती केली. संबंधित एजन्सीने ठाकरे स्मारक ट्रस्टला शिवसेना संस्थापक यांच्या जीवनावरील ऑडिओ-व्हिडिओ शो, डिजिटल वॉल्स आणि लेझर शोचे सादरीकरण केले. मात्र ठाकरे कुटुंबीय आणि पक्षाच्या नेत्यांचे वर्चस्व असलेल्या ट्रस्टने त्यावर नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या ठेकेदारांकडून हे काम करण्याची मागणी केली. परंतु, एमएमआरडीने यावर अद्याप निर्णय न घेतल्याने कामाला विलंब होणार आहे. ठाकरे स्मारक ट्रस्टच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली असून सुभाष देसाई हे सदस्य सचिव आहेत.
 
शिवसेनाप्रमुखांच्या जीवनाशी संबंधित काम असल्याने मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संस्थेने ठाकरे स्मारक ट्रस्टशी सल्लामसलत करून प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, ठेकेदाराने सादर केलेली कल्पना नाकारत नवा ठेकेदार नेमण्याची ट्रस्टने मागणी केली. एमएमआरडीएच्या अख्यारित ती येत नाही. नवा ठेकेदार नेमण्याचे अधिकार नगरविकास विभागाकडे आहेत. ट्रस्टच्या मागणीनुसार नगरविकास विभागाला लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे खाते आहे. त्यांच्या आदेशानुसार ठेकेदार देऊ शकत नाही.एमएमआरडीए केवळ दुसरा आराखडा तयार करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला निर्देश देऊ शकते, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.