'त्या' जाहिरातीच्या वादावर पडदा, शिंदे- फडणवीस एकाच मंचावर !

Santosh Gaikwad June 15, 2023 06:42 PM


मुंबई : राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशा आशयाच्या वृत्तपत्रातील जाहिरातीवरून शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर आजाराचे कारण सांगून फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबरचे दोन कार्यक्रम रद्द केले होते. या जाहिरातीवरून विरोधकांना आयते कोलीत मिळाल्याने त्यांच्याकडून टीकेचा भडीमार सुरू होता. अखेर आज पालघर येथे सरकार आपल्या दारी या कार्यक्रमात शिंदे फडणवीस एकाच मंचावर दिसून आले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास केला. दोघांनीही भाषणात एकमेकांचा लोकप्रिय असा उल्लेख करीत तोंडभरून कौतूक करीत जाहिरात वादावर पडदा टाकला.  


शिंदे म्हणाले की,  शिंदे-फडणवीस यांची दोस्ती आज-कालची नाही, १५-२० वर्षांपासूनची आहे. हे फेव्हिकॉलचा जोड आहे. सहजासहजी सुटणार नाही आणि तुटणारही नाही,ही. काही जण म्हणातात 'जय-विरू'ची जोडी, काही जण म्हणतात धरमवीर; पण ही युती खुर्चीसाठी नाही, स्वार्थासाठी नाही. स्वार्थासाठी एकत्र आले होते त्यांना जनतेने बाजूला केले आहे. तेव्हापासून लोकहिताची कामे करत आहोत. म्हणून काहीनी राज्य सरकारला पसंत केले. मात्र आनंद या गोष्टीचा आहे की, त्या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ८४  टक्के लोकांनी पसंती दिली आहे. या देशाचा सन्मान जगभरात पोहोचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जगात ते आज लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर आहेत, असे म्हणत त्यांनी जाहिरातीच्या वादावर पडदा टाकला. आम्ही कालही कार्यकर्ते होतो. आजही कार्यकर्ते आहोत आणि उद्याही कार्यकर्ते म्हणून असू. आमच्या डोक्यात सत्तेची हवा नाही. आमचे सरकार फेसबुक लाईव्ह नसून अॅक्शनमोडमध्ये असणारे सरकार असल्याचा उच्चार महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांच्या पसंतीच्या टक्केवारीवरही पडदा टाकला.  

हे डबल इंजीन सरकार येण्यापूर्वी सर्व कामांना स्पीडब्रेकर लागले होते. पण या अकरा महिन्यात सर्व स्पीड ब्रेकर उठवले आणि तिसऱ्या क्रमांकावर गेलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणला. ही युती स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी झालेली नाही. वैचारिक विचारांसाठी झाली आहे. युतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झाला, पण तो आम्ही काढून टाकला आणि युती अधिक भक्कम केली असे शिंदे म्हणाले. 


फडणवीस म्हणाले की, आमचा प्रवास कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही आमचा प्रवास एकत्रच असेल. कारण आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी, पदे मिळवण्यासाठी सरकार तयार केलेले नाही, तर हे सरकार जनसामान्यांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिवर्तन झाले पाहिजे म्हणून तयार केले आहे. एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कुणाच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये कुठे काही होईल इतके तकलादू हे सरकार नाही. आमचा २५ वर्षांपासून एकत्र प्रवास आहे, पण गेल्यावर्षभरात तो अधिक घट्ट आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कुणीही करण्याची गरज नाही. आमचा प्रवास कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  हे जुने सरकार नाही. आधीचे सरकार आपल्या घरी, मात्र आताचे सरकार तुमच्या दारी" हा जुन्या आणि नव्या सरकार मधला फरक आहे. जनतेची सेवा करण्यासाठी आमचे सरकार स्थापन झाले आहे. जो पर्यंत प्रत्येक नागरिकाला लाभ मिळत नाही तोपर्यंत शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरुच राहणार, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. हे सरकार सामान्यांसाठी काम करणारे सरकार आहे. जाहिरातीमुळे कोसळण्याइतपत हे सरकार तकलादू नाही असे म्हणत जाहिरात वादावर फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

---