तीन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार, आरोपींवर कठोर कारवाई करा : उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Santosh Gaikwad July 09, 2023 08:57 PM


दौंड : पंडिता रमाबाई मुक्ती मिशन, केडगाव येथील तीन गतिमंद मुलींवर मुक्ती मिशन मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका मजुराने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी तीन वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी सुभाष झोरे, ३५ वर्षे, रा. केडगाव ता. दौंड यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण आहे तसेच अटक आरोपींचे इतर साथीदार कोण आहेत याचा तपास करून त्यांच्यावरही कठेार कारवाई करण्यात यावी असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गो-हे यांनी पुणे ग्रामीणच पोलीस अधीक्षक  अंकित गोयल यांना एका लेखी पत्रान्वये दिले आहेत. 


पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ही एक नामांकित संस्था आहे. ही संस्था अनेक वर्षे समाजाची सेवा करत आहे. गरजू महिला आणि मुलींना निवारा, शिक्षण आणि सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करते. अशा घटनेमुळे मिशन आणि त्याच्या कर्मचार्‍यांची प्रतिष्ठा आणि विश्वास कलंकित झाला आहे. पीडितांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीला केडगाव, दौंड पोलिसांनी अटक केली असून तो सध्या त्यांच्या ताब्यात आहे. याबाबतचा तपास उप-विभागीय पोलीस अधिकारी दौंड स्वप्नील जाधव करत आहेत.  या घटनेसंदर्भात तपास अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्याशी डॉ गोऱ्हे यांचे तपशीलवार बोलणे झाले आहे.

 वरील घटने संदर्भात डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लेखी  पत्राद्वारे या गंभीर प्रकरणावर संबंधित अधिकारी यांना योग्य आदेश देण्यात यावेत असेही सूचित केले आहे.

 पिडीत मुलींचे मनोबल वाढवून त्या बद्दलचे आणखी पुरावे कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून आरोपीस शिक्षे पर्यत पोहचवणे सोपे होऊ शकेल. मुलींच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे उल्लंघन केले आहे, या मुलींनी अगोदरच त्यांच्या आयुष्यात आधीच अनेक संकटांचा सामना केला आहे. मुलींना मनोधैर्य योजने अंतर्गत मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच केलेल्या कार्यवाही बाबत उपसभापती कार्यालयास अवगत करावे असेही डॉ गोऱ्हे यांनी सुचित केले आहे. 

----------