आप ला ते प्रचार गीत वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई

Santosh Gaikwad April 28, 2024 06:29 PM


नवी दिल्ली : आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेले गाणे  वापरण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. दोन मिनिटांच्या या प्रचार गाण्यात तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दाखविण्यात आले आहे. गाणे वापरण्यास मनाई करण्यात आल्याची नोटीस प्राप्त झाल्यानंतर ‘आप’ नेत्या आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला आहे. ‘‘हुकूमशाही सरकारांमध्ये विरोधी पक्षांना प्रचार करण्यापासून रोखले जात आहे,’’ असा आरोप आतिशी यांनी केला.

‘आप’चे आमदार दिलीप पांडे यांनी हे गाणे लिहिले आहे. 'तुरुंगाचे उत्तर मतांद्वारे' असा या गाण्याचा आशय होता. या गाण्यात ‘आप’ नेत्यांच्या अटकेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे वापरण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या नोटिशीनुसार या गाण्याद्वारे सत्ताधारी पक्ष आणि तपास संस्थांची खराब प्रतिमा दाखविण्यात आली आहे. 

‘आप’ नेत्या आतिशी म्हणाल्या की,  आम्ही कोणत्याही प्रकारे आचारसंहिता तोडलेली नाही. प्रचार गाण्यामध्ये कुठेही भाजपचे नाव घेण्यात आलेले नाही. ‘तुरुंगाचे उत्तर मतांद्वारे’ या वाक्याला आयोगाने आक्षेप घेतला आहे. मात्र त्यात आक्षेपार्ह असे काहीही नाही. गाण्याद्वारे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असे आतिशी यांनी सांगितले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षाचे प्रचार गाणे रोखण्यात आले आहे. भाजपकडून वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले, मात्र त्या पक्षाविरोधात आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही असेही त्या म्हणाल्या.