पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या जाणीवपूर्वक केल्याचे उघड : गृहमंत्र्यांची माहिती

Santosh Gaikwad March 17, 2023 12:00 AM

मुंबई : रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या जाणीवपूर्वक वाहन अपघात घडवून केली असल्याचे आढळून आले आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पा विरोधात पत्रकार शशिकांत वारीशे यांनी वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती या संदर्भात सदस्य अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे ,सतीश चव्हाण, सचिन आहेर, सुनील शिंदे विलास पोतनीस, विक्रम काळे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात सांगितले की, पत्रकार वारिशे यांची नाणार  परिसरात जाणीवपूर्वक वाहन अपघात घडवून 6 फेब्रुवारी 2023 रोजी निर्घृण हत्या करण्यात आल्याचे आढळून आले आहे. पत्रकार शशिकांत वारीशे यांनी वृत्तपत्रात आरोपी विरुद्ध बातमी दिलेली होती. त्या गोष्टीचा राग मनात धरून उद्देश पूर्वक व जाणीवपूर्वक गाडीला ठोकर देऊन त्यांना  जीव ठार मारले असल्याबाबत फिर्यादी यांनी पुरवणी जबाब दिल्यावरून सदर गुन्ह्यात कलम 302 समाविष्ट करण्यात आलेला आहे. पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा कट हा पूर्वनियोजित आहे किंवा कसे याबाबतचा तपास करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक यांचे अधिपत्याखाली एस. आय. टी. ची स्थापना करण्यात आली असून, पुढील तपास एसआयटी मार्फत व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.