डॉ. हेगडे चषक क्रिकेट स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलची विजयी सलामी

Santosh Sakpal June 03, 2023 05:51 AM


मुंबई : लायन्स क्लब इंटरनॅशनल-मुंबईचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित सुरु झालेल्या आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाने सलामीचा सामना जिंकला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये रोहन महाडिक, सुदेश यादव, अर्जुन चीदालिया यांच्या अप्रतिम खेळामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने बलाढ्य जे.जे. हॉस्पिटलचा ३ विकेटने पराभव केला. मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे शानदार उद्घाटन शिवाजी पार्क मैदानात झाले. याप्रसंगी रुग्णालयीन अष्टपैलू क्रिकेटपटू सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्रिकेट संघाचे डॉ. इब्राहीम शेख व बॉम्बे हॉस्पिटल क्रिकेट संघाचे संतोष रांगवकर यांचा विशेष गौरव होणार आहे.


    ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध नाणेफेक जिंकून जे.जे. हॉस्पिटलने प्रथम फलंदाजी केली. ३ बाद ६ धावा अशा निराशाजनक प्रारंभानंतर अभिजित मोरे (२७ चेंडूत ३३ धावा) व राकेश शेलार (२७ चेंडूत ३३ धावा) जोडीने सहाव्या विकेटसाठी ६१ धावांची तर राकेश सोबत कप्तान नरेश शिवतरकरने ( १४ चेंडूत २० धावा) सातव्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी केली. परिणामी जे.जे. हॉस्पिटल संघाला सर्वबाद १३७ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. सुदेश यादव (२० धावांत ३ बळी), अर्जुन चीदालिया (२० धावांत ३ बळी), प्रफुल मारू (१३ धावांत २ बळी) यांनी उत्तम गोलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर रोहन महाडिकने (३२ चेंडूत ४५ धावा) एका बाजूने भक्कम किल्ला लढविल्यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाला १९.३ षटकात ७ बाद १३८ अशी विजयी धावसंख्या रचता आली. जे.जे. हॉस्पिटलच्या सुभाष शिवगण, रोहन म्हापणकर, अभिजित मोरे, जगदीश वाघेला, राकेश शेलार यांनी विकेट घेणारी गोलंदाजी करून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाला विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंजविले. रोहन महाडिक व अभिजित मोरे यांनी सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकाविला.


******************************