पुण्याच्या आयुष गरुडने दिलीप करंगुटकर स्मृती कॅरम स्पर्धा जिंकली

Santosh Sakpal April 07, 2024 03:06 PM

मुंबई NHI NEWS AGENCY MUMBAI 

   आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय एकेरी कॅरम स्पर्धा पुण्याच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा आयुष गरुडने जिंकली. १२ वर्षीय आयुष गरुडने सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य व मोक्याच्या क्षणी अचूक फटकेबाजी करून गतवर्षी हुलकावणी देणाऱ्या आयडियल कॅरम स्पर्धेचे अखेर विजेतेपद हासील केले. धडाकेबाज खेळ करून अंतिम फेरी गाठणाऱ्या पार्ले टिळक विद्यालयाचा उदयोन्मुख कॅरमपटू सार्थक केरकरचा यंदा राष्ट्रीय स्तरावर उपविजेतेपद पटकाविणारा सबज्युनियर कॅरमपटू आयुष गरुडने १३-० असा पराभव केला. परिणामी सार्थकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. डॉ. विशाल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कारासह गौरविण्यात आले.


   सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ व अविनाश स्पोर्ट्स सहकार्यीत दैवत रंगमंच-भायखळा येथील स्पर्धेत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, पुणे आदी जिल्ह्यातील ४६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. उपांत्य फेरीत सार्थक केरकरने सेंट मेरी हायस्कूल-माझगावच्या जितेंद्र जाधववर २५-० असा तर आयुष गरुडने ह्यूम हायस्कूल-भायखळ्याच्या आदेश महाडिकवर २५-० असा नील गेम दिला. प्रतिवर्षी मोफत प्रशिक्षणासह किमान ८ विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धा साकारल्यामुळे काही शालेय खेळाडू राष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करीत असल्याबद्दल शिक्षक तसेच पालकांनी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. शालेय खेळाडूंची गरज लक्षात घेऊन लवकरच आयडियल मोफत प्रशिक्षणासह शालेय कॅरम स्पर्धा आयोजित होणार असल्याची माहिती अध्यक्ष लीलाधर चव्हाण व कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली.      


 **************************