मुंबईकरांनी स्वच्छतेची लोकचळवळ अधिक बळकट करावी : चहल

Santosh Gaikwad March 16, 2024 10:20 PM

 
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सखोल स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्‍लीन ड्राईव्‍ह) अंतर्गत महानगरपालिकेच्‍या सर्व २५ प्रशासकीय विभागांमध्ये आज (दिनांक १६ मार्च २०२४) एकाच वेळी सार्वजनिक स्‍वच्‍छतेचा जागर करण्‍यात आला. गजबजलेल्या, दाटीवाटीच्या, अरुंद वसाहतींमधील  लहानसहान गल्‍लीबोळ यांची स्‍वच्‍छता करण्‍यात आली. यात, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. मुंबईकर नागरिकांनी स्वच्छतेची लोकचळवळ अधिक बळकट करावी, असे आवाहनदेखील आयुक्त महोदयांनी यानिमित्त केले.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार, स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडून २५ प्रशासकीय विभागात सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येत आहे. महानगरपालिका आयुक्‍त डॉ.  इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार ही मोहीम सलग १६ आठवडे सुरू असून सर्वत्र स्थानिक नागरिकांचा चांगला सहभाग मिळतो आहे.

रस्ते, पदपथ, लहान-सहान गल्लीबोळांमध्ये असलेला घनकचरा तसेच टाकाऊ वस्तू पूर्णपणे काढणे, ब्रशिंग करुन रस्ते, पदपथांवरील धूळ काढणे, त्यानंतर पाण्याने धुणे ही सर्व कार्यवाही करतानाच रस्‍त्‍यांवर उगवलेली खुरटी झाडीझुडपे समूळ काढणे, अवैध जा‍हिरात फलक हटविणे, कीटकनाशक धूर फवारणी, पावसाळी जाळ्या - गटारे व नाले यांची स्‍वच्‍छता, धोकादायक तारांचे जंजाळ काढणे आदी विविध कामे आजच्या सखोल स्वच्छता मोहिमेतून करण्यात आली.

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आज सकाळी ७.३० वाजेपासून केलेल्या दौ-यात या सर्व कार्यवाहीची पाहणी करतानाच स्वतः सखोल स्वच्छता मोहिमेत प्रत्‍यक्ष सहभाग घेतला. देवी पाडा मैदान, विठ्ठल मंदीर, टायटॅनिक इमारत, माने कंपाऊंड, मासळी बाजार आदी परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आयुक्त डॉ. चहल म्हणाले की, मुंबई महानगरात राबविण्यात येत असलेल्या सखोल स्‍वच्‍छता मोहिमेचे सकारात्‍मक परिणाम मुंबईकरांनी अनुभवले आहेत. मुंबईत मागील पाच वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील वायू गुणवत्ता लक्षात घेता यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक स्वच्छ हवा असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दोन महिन्‍यांपूर्वी ३०० ते ३५० दरम्यान असणारा वायू गुणवत्‍ता निर्देशांक आता १०० पेक्षाही खाली आला आहे. काही ठिकाणी तर हा निर्देशांक अवघा ५० आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या विविध उपाययोजनांमुळे वायू प्रदूषणात घट झाली आहे, हे त्यातून आपोआप अधोरेखित होते. त्याखेरिज, साथरोग आजारांमध्ये देखील घट झाल्‍याचे आकडेवारीवरून स्‍पष्‍ट झाले आहे, असेही आयुक्त महोदयांनी नमूद केले.