मी लेखन मराठीत आणि पत्रकारिता इंग्रजीत केली : शिरीष कणेकर

Santosh Gaikwad June 23, 2023 07:19 PM


मुंबई : मी लेखन जरी मराठीत केले असले आणि माझी ५५ पुस्तके प्रसिद्ध झाली असली तरी पत्रकारिता मात्र मी इंग्रजीतच केली, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार आणि मराठीतील लोकप्रिय लेखक श्री. शिरीष कणेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात काढले. संघाच्या ८२ व्या वर्धापनदिन प्रसंगी महनीय प्रवक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे होते.


    आपल्या लिखाणाविषयी सांगताना  कणेकर म्हणाले की, ‘मी लिहू लागल्यावर माझ्या वडिलांनी एकदा माझा लेख वाचून मला म्हटले, ‘तू फार छान लिहितोस.’ वडिलांनी केलेले हे कौतुक मला मिळालेला सर्वात मोठा कॉम्लीमेंट होता, असे मी मानतो.’ याप्रसंगी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या आठवणींना उजाळा देत कणेकरांनी प्रेक्षकांतून हशा वसूल केला. लतादीदी कशा दिलखुलासपणे फोनवर गप्पा मारायच्या आणि राजेश खन्ना कसा रात्री-अपरात्री फोन करून जाग आणायचा, हेदेखील कणेकरांनी खास कणेकरी शैलीत सांगितले.


    मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्फे  दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कार याप्रसंगी  कणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे यंदाचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत :

१) शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार’ : शर्मिला कलगुटकर (दै. महाराष्ट्र टाइम्स). २) वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रितशोधकास दिला जाणारा ‘कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर’ पुरस्कार : श्री. श्रीकांत नाईक. ३) सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा ‘समतानंद अनंत हरि गद्रे’ पुरस्कार : . नंदकुमार पाटील. ४) वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा ‘अ‍ॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार’ पुरस्कार :  सचिन कमळाकर वैद्य (दै. सामना). ५) ज्येष्ठ पत्रकार/संपादकास दिला जाणारा ‘युगारंभकार, सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार’ : . अनिकेत जोशी (संपादक, दै. बित्तंबातमी).


     वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना  कणेकर यांच्या हस्ते पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सदर सन्माननीय सदस्य पुढीलप्रमाणे आहेत : श्री. सुनील वि. वागळे, श्री. विश्वास क. डिग्गीकर, श्री. श्रीकृष्ण द. राणे, डॉ. प्रकाश स. खांडगे, श्री. प्रदीप अ. कोचरेकर, श्री. दिनेश रामकृष्ण गुणे, श्री. सिलवेस्टर मिनेजस, श्री. लिलाधर दशरथ चव्हाण आणि श्री. भारत तुळाजी कदम.

महनीय प्रवक्ते शिरीष कणेकर यांना अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांच्या हस्ते सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. प्रारंभी कार्यवाह श्री. संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. तर अध्यक्ष  वाबळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांनी आभार मानले. कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हुंजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.